MarathiBlogNet

गुरुवार, 26 जुलाई 2012

मुली

एक दिवस चौकातील पान ठेल्यावर गेलो. पान दुकानदार शेट्टी मंगलोरचा ज्याला सगळे अण्णा संबोधत होते. अण्णाची मुलगी बारावीला महाराष्ट्रात शास्त्र विभागात पहिली आली होती. अण्णा खाजगी नोकरी करुन पान ठेला चालवतो. त्याची मुलगी बुद्धीमान निघाली. घरची गरीबी ओळखुन सायकल वर सारडा कॉलेजला जाई व मन लावुन अभ्यास करी. याचे फळ तिला मिळाले. पुण्याला सरकारी इंजीनीयरिंग कॉलेजला चांगल्या गुणांमुळे प्रवेश मिळाला.
याच अण्णाच्या दुकानात प्रसिध्द कवि अशोक कोतवाल यांची कविता मुली ही वाचली. ही कविता कोणा रसिकाने कॅलेंडरच्या सुंदर आकर्षक रुपात छापून मोफत वाटली होती. कवितांचे कॅलेंडर निघावे हा त्या कविचा किती मोठा सन्मान. त्यावरील मोबाईल क्रमांकामुळे श्री.अशोक कोतवाल यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी आणखी काही कविता मला पाठवुन दिल्या. त्यांच्या काही कवितांचा मी हिंदी अनुवाद केला आहे. मराठी रसिकां साठी त्यांची मुली ही कविता देत आहे.

मुली

“ मुलीची जात “
हे शब्द उच्चारवत नाहीत मला !
मुली कशाही वागल्या
तरीही...

मुली मुलीच असतात !
किती तन्मयतेनं
त्या सजवित राहतात घर !
त्यांच्या नुसत्या असण्याने
बोलु लागतात भिंती
नि डोलू लागते छप्पर...

मुली भरुन टाकतात अंगण
नि वळचणीतले रांजण
मनातल्या स्वप्नांनी-रंगानी
शाश्वत रंगांनाही रंग देण्याचे
कौशल्य असते त्यात
हा सोस नसतो मुलींचा
तर ध्यास असतो नव्या उर्मींचा !

मुली असतात
उन्हाची कातर छाया
लहरती... बहरती कापूर काया
त्या सुखाचा मंद प्रकाश
नि मायेचं झुलतं... धुंद आकाश
त्या विश्वाचा कोवळा हात
जगाची अधाशी तहान
त्या असतात
काळाचे फडफडते.. कोरे
करकरीत पान

म्हणून मुलींना
करु द्यावेत हट्ट
नि होऊ द्यावे स्वछंदी
हीच तर असते
त्यांच्या प्राक्तनात पेटलेल्या
निराजंनातील असोशीची नांदी !

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें