मराठीतील ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांचे मी काबाडीचे धनी या संग्रहाचे अकरावी आवृत्ती नुकतीच प्रकाशित करण्यात आले आहे ग्रामीण साहित्यामध्ये ही दीर्घ कविता खूपच गाजली होती कवी मंचावर या संग्रहातील अनेक संदर्भ दिलेली आहेत हा संग्रह त्याकाळी अत्यंत प्रसिद्ध व लोकप्रिय होता नुकतेच इंद्रजीत भालेकर भालेराव सरांची भेट नगर येथे झाली त्यांच्या या नवीन कोऱ्या करकरीत अकरावी आवृत्ती पुस्तक त्यांनी मला भेट केले एक साधारण वाचक या नात्याने मला खूप आनंद झाला
मी काबाडाचे धनी हा संग्रह वाचला. शेतकरी वर्गातील कुणबी हा वर्ग नेहमीच दुर्लक्षित गरीब घटक आहे. या संग्रहातील मारुती चितमपल्ली, राजन गवस यांच्या प्रतिक्रिया खूपच बोलक्या व अर्थपूर्णआहेत.
कुणबी आई आपल्या लेकराला उपदेश करताना कुणबी कुळाचे मर्म सांगते. आपला जन्म तोंडात माती घेऊन होतो. मातीचे पीक खाऊनच तो वाढतो. त्याचा जन्मच मातीसाठी व मरण ही मातीसाठी असते. मातीला त्याने कधी विसरू नये.
कुणबी बापाचे वागणे काटेकोर, शिस्तबध्द असते. कष्ट करणे,शेती मधील सर्व कामे व्यवस्थित मार्गी लावणे यासाठी तुम्ही फारच छान भावना व्यक्त केल्या आहेत.
बाप शेत कसायचा सारे नियम पाळून जाता येता पाहायचे वाटसरू न्याहाळून धुरे बंधारे बंदिस्ती नीटनेटकी राह्याची उगा कुठं पडलेली नाही काटकी राह्याची
आधी कपाळाला माती मग पाऊल रानात रोज शेताला निवद नेई केळीच्या पानात उभ्या पिकात दिशेला कव्हा बसायचा नाही कस कमी झाल्यावर रान कसायचा नाही
दोरी न लावता सारं दोरीमधी असायचं उगवनारं धानही वरी खाली नसायचं बैल वाकडा तिकडा चालला की इकायचा गडी वाकडा तिकडा वागला की हाकायचा
समाजामधील परिस्थिती व एकूणच या व्यवस्थेविषयी चीड व्यक्त करताना आपण श्रमिक वर्गाची तीव्र भावना व्यक्त केली आहे.
कापसाच्या धाग्यातून होते कापड तय्यार पिकविणारे कापूस उघडेच राहणार
उघडेच राहणार मातीमधी राबणारे
राज्य करतात त्यांना पायाखाली दाबणारे
या कवितेतील काही ओळी शृंगार रस व प्रेमभावना व्यक्त करणाऱ्या आहेत. तारुण्याच्या सुलभ भावना व्यक्त करताना आपण लिहिले आहे की
कोवळ्या नजरेची कोवळी कळी पोर कोवळ्या डोळ्यातली कोवळी भिर भिर कोवळ्या छातीवर कोवळे झाले ओझे कोवळ्या चालीनं तू चालशी वजे बजे
कष्ट करणारा कुणबी शेतकरी आपल्या कुळाचे आपल्या जन्माचे सार सांगताना या माती विषयी तो श्रद्धा व्यक्त करतो ती आपण फारच सुंदर शब्दात व्यक्त केली आहे.
आता मातीशी संसार झाडझुडपच बाळ तिचा मांडून पसारा घरीदारी रानोमाळ जव्हा आलो नाळ माईच्या नाळाची तव्हापासून घासली नाळ मातीला बाळाची
भारतीय लग्न संस्थेतील सर्वच बाप आपल्या लेकीला सासरी पाठवताना काही भावना व्यक्त करत असतात.उपदेश करताना ते आपल्या मुलीला दोन गोष्टी सांगतात. त्यासाठी आपण छान शब्द योजले आहेत
बाप बोले लेकी इख खाऊन नांदाव पित्याच्या नावाचं जगी देऊळ बांधावं
बाप बोले लेकी मन आमचं कठोर
किती बांधला बंधारा तरी टिकल कोठोर
कुणबी जेव्हा कष्टाने, दुःखाने पिचलेला असतो व आपल्या व्यथा घर, शेती, परिसर समाजाबद्दल, व्यवस्थेबद्दल व्यक्त करीत असतो तेव्हा ते विचार आपण अस्सल ग्रामीण ढंगात तेथील सृजनशील मातीमध्ये व्यक्त केल्या आहेत. जमीन शेती व तेथील माती त्याला कधी सोडत नाही. शेवट त्याचा तेथील मातीत होतो. परंतु एवढे दुःख वेदना सहन करण्याची कोणती आत्मिक शक्ती सांस्कृतिक पुंजी ,कुठला विठ्ठल कोणती भक्ती त्याला या जीवन प्रवासाला चालण्यासाठी प्रवृत्त करते हे समजत नाही. मला वाटते मानवी मनाच्या भावना घर, परिवार, प्राणी ,निसर्ग, जमीन यात नेहमीच गुंतलेल्या असतात.
एक कवी या नात्याने आपण गरीब कष्टकरी वर्गाच्या भावना या दीर्घ कवितेत प्रांजळपणे तेथील मातीच्या अस्सल रंग ढंग घेऊन व्यक्त केल्या आहेत. साहित्यिक मूल्य सांभाळताना आपण कोणत्याही एका विशिष्ट विचार सरणी अथवा गटा कडे न झुकता मानवी सुख दुःख प्रकट केल्या आहेत. साहित्य सृजन करताना कवी तटस्थ असावा का हा कळीचा मुद्दा असू शकेल.
या संग्रहामध्ये एक छोटीशी सूचना व्यक्त करावीशी वाटते ती म्हणजे ग्रामीण मराठवाडी भाषेतील काही विशिष्ट शब्द विचार येथे व्यक्त होतात. त्या शहरी वाचक वर्गा करिता परिशिष्टामध्ये अथवा संबंधित पानाच्या खाली व्याख्या दिली तर उत्तमच.
या संग्रह बद्दल कवीची भूमिका महत्त्वपूर्ण असते. ती अवश्य असावीच परंतु कविता प्रकाशन ,प्रिंटिंग , चित्रे या तांत्रिक गोष्टी व अन्य प्रतिक्रिया यामध्ये असू नयेत असे माझे प्रांजळ मत आहे.आपल्या कवितेची भूमिका वाचकाला स्वतः ठरू द्यावी. कवितेवरील प्रतिक्रिया वाचल्यामुळे एक ठराविक वाट निर्माण होते. कदाचित मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे क्षमस्व.
मी एक सामान्य वाचक या नात्याने माझ्या भावना
व्यक्त केल्या आहेत.
विजय नगरकर
अहमदनगर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें